Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Monday, November 29, 2010

मधमाशीपालनाचा यशस्वी उपक्रम

प्राचीन काळापासून आपल्याकडे मधाचा औषधी वापर केला जात आहे. सौंदर्य प्रसाधने, त्याचबरोबर रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठीही मधाचा वापर केला जातो. आयुर्वेदामध्ये मधाचे अनेक औषधी महत्व सांगितले आहे. आयुर्वेदिक औषधामध्ये मधाचा वापर तर होतोच याशिवाय अनेक धार्मिक विधीतही मधास महत्वाचे स्थान दिले गेले आहे. यामुळे राज्यात व देशांतर्गत मधाला बाराही महिने मागणी असते. मधाची मागणी विचारात घेऊन मधमाशा पालनाचा व्यवसाय महिला बचत गटांमार्फत सुरु करुन त्यांना आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी बनवण्याची योजना नाबार्डमार्फत कोल्हापुरात यशस्वीपणे अंमलात आणली गेली.

कोल्हापूर जिल्ह्यात मध निर्मितीसाठी असलेले पोषक वातावरण, भौगोलिक परिस्थिती आणि मुख्य बाब म्हणजे उपलब्ध असलेली वनसंपदा पाहून पन्हाळा तालुक्यातील किसरुळ या गावाची निवड करण्यात आली. राज्यात प्रथमच करण्यात आलेला हा प्रयोग यशस्वी झाला असून डोंगराळ भागातील महिला आता मधमाशा पालनाचा व्यवसायही करु शकतात हे सिध्द झाले आहे.

मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक, गजानन महाराज बहुउद्देशीय संस्था तसेच युटीएमटी या संस्थेमार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील किसरुळ या नैसर्गिक वनसंपत्तीने नटलेल्या गावाची येथील मधमाशांसाठी असलेले पोषक वातावरण पाहून निवड करण्यात आली होती. या महिलांना स्थानिक सातेरी जातीच्या मधमाशा पकडणे, त्यांना पेटीत ठेवून त्यांचे संवर्धन करणे, पेटीतून मध काढणे, त्यांची विक्री करणे, याविषयीचे विशेष प्रशिक्षण या महिलांना देण्यात आले. बचत गटाच्या अध्यक्षा मालुताई पोवार या संदर्भात बोलतांना म्हणाल्या, आम्ही सुरवातीस २५ पेटय़ा ठेवून हा व्यवसाय सुरु केला. पहिल्यांदा आम्हाला २० किलो शुध्द मध मिळाला. हा सर्व मध आम्ही मधमाशांना न मारता काढला आहे. याबाबतचे प्रशिक्षण आम्ही घेतले आहे त्याचा आम्हाला फायदा झाला आहे. गटातील महिला आता उत्साहाने काम करीत आहेत. यावर्षी पावसाळा लांबल्याने मध थोडा कमी मिळाला आहे, पण येत्या हंगामात जास्तीत जास्त मध मिळेल असे आत्मविश्वासाने त्यांनी सांगितले.

पुढील वर्षी जानेवारी २०११ मध्ये या व्यवसायाला थोडा जास्त वेग येण्याची शक्यता आहे. कमी कष्ट आणि मुख्य बाब म्हणजे खर्चही कमी, त्यामुळे या व्यवसायात आता महिला बचत गट सहभागी होण्याची शक्यता वाढली आहे. किसरुळच्या या राज्यातील पहिल्या मधमाशी पालन व्यवसाय करणार्‍या महिला गटाची माहिती लंडनस्थित एक अभ्यासक श्री. सोफी यांना समजल्याने त्यांनी स्वत: येथे येऊन या ग्रामीण महिलांशी संवाद साधला. महिलांच्या कामाची पाहणी करुन कौतुकही केले. जिल्हा बँकेचे गोरख शिंदे, गजानन महाराज संस्थेचे राजेंद्र जाधव यांची मदत या महिलांना लाभली आहे. महिलांनी पारंपारिक लोणची, पापड, लाडू, चकली सारखे चाकोरीबध्द व्यवसाय तर करावेत पण त्याहून जास्त लाभ देणारे मधमाशा पालन सारखे व्यवसाय त्याला जोडधंदा म्हणून करावयास हरकत नाही. डोंगराळ, दुर्गम भागात इतर व्यवसाय करणे फारच अवघड असते. मग अशा ठिकाणी नैसर्गिक विपुलता, वनसंपदा भरपूर असते. मधमाशा पालनाचा व्यवसाय अशा ठिकाणी करावयास कोणतीच हरकत नाही हे यावरुन सिध्द झाले आहे.

या दुर्गम भागातील महिलांनी उत्पादित केलेल्या मधाला मागणीही आता येत आहे. शिवाय श्रीमती मालुताई पोवार महिलांना प्रशिक्षण देत असतात. आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेले आपले गाव या व्यवसायामुळे प्रकाश झोतात आल्याबद्दल त्या समाधानी आहेत. इतर महिलांना जर प्रशिक्षण घ्यावयाचे असेल किंवा जर शुध्द मध घ्यावयाचा असेल तर ९६३७६८६२३५ या आपल्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा अशी विनंती त्यांनी केली आहे. चला तर मध खरेदी करुन या आपल्या भगिनींच्या व्यवसायाला हातभार लावू या http://mahanews.gov.in

No comments:

Post a Comment

Visit Our Page