Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Tuesday, October 20, 2015

"गर्भसंस्कारांचा अंधश्रध्द सापळा". . . . दैनिक लोकसत्ता आणि वास्तव

"गर्भसंस्कारांचा अंधश्रध्द सापळा". . . . दैनिक लोकसत्ता आणि वास्तव
डॉ. चंद्रकांत संकलेचा व डॉ. अरुण गद्रे ह्यांच्या लेखाचा कल हा प्रामुख्याने वैदू व भोंदू अशा आयुर्वेदीय वैद्यक व्यावसायिकांबाबत जाणवतो. असे असले तरीही ह्या उभयतांचे आयुर्वेदाचे ज्ञान उथळ असल्याचेही जाणवते. आयुर्वेदाबाबत त्यांनी केलेली विधाने व परीक्षणे, ‘संस्कार’ ह्या संकल्पनेकडे पाहण्याचा दृष्टीकोन अशास्त्रीय दिसतो. मोजक्या रुग्णांकडील ऐकीव माहिती शास्त्रीय कसोट्यांवर पडताळून न पाहता त्यावर आरोपपत्र सदृश मतप्रदर्शन करणे हे योग्य वाटत नाही.
सद्यस्थितीत गरज नसतांनाही अनेक डॉक्टर सिझेरियन सारख्या शस्त्रक्रिया, अवाजवी वैद्यकीय तपासण्या, गर्भाशय निर्हरण शस्त्रक्रिया (Histrectomy) करीत असतात. किंबहुना नर्सिंगहोम / हॉस्पिटल्सचा पायाच अशा गोष्टींवर उभारलेला असतो. अर्थात डॉक्टर म्हटले की त्याच्या जीवनात ‘अर्था’ शिवाय अर्थच नसतो. उत्तम गुण मिळवून पास झालेल्या विद्यार्थ्याला डॉक्टरच बनायचे असते कारण आजूबाजूच्या डॉक्टरांची भरभराट तो आपल्या डोळ्याने बघत असतो. मी एक चित्रकार होणार किंवा कवी होणार असे म्हणणारा हुशार विद्यार्थी विरळाच.
बुडती हे जन देखवे ना डोळा
येतो कळवळा म्हणोनिया –
हे जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अभंगातील अवतरण ह्याठिकाणी चपखल असले तरीही डॉक्टर द्वय वैद्यकीय व्यवसायातील इतर अनैतिक बाबींकडे लक्ष देत असल्याचे आमच्या वाचनात नाही. कोणतेही शास्त्र सर्वार्थाने परिपूर्ण असू शकत नाही हे दोघांनाही माहीत असेलच.
भारतीय वैद्यक शास्त्रात अनेक संस्कार वर्णन केलेले आहेत, त्यापैकी ‘डोहाळे जेवणाचा’ संस्कार डॉक्टरांच्याही घरी असेलच. हिंदूंमध्ये गरोदरपणातील हा संस्कार म्हणजे एक पर्वणी समजला जातो. अन्य संस्कारात ‘विवाह संस्कार, नामकरण संस्कार, सप्तपदी, कर्णवेधन, नासावेधन’ असे अनेक संस्कार शास्त्रात वर्णन केले आहेत. ह्याशिवाय मंत्रोच्चारांमध्ये अथर्वशीर्ष, गायत्रीमंत्र, रामरक्षा, आचमन हे सर्व संस्कार डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे सर्व लोकांनी त्वरित बंद करावेत. विवाहसंस्कार तर तज्ञ डॉक्टरांनी मुळीच करू नये कारण त्यामध्ये पैशाचा, अन्नाचा, वेळेचा अपव्यय खूप मोठ्या प्रमाणात होतो. तो पैसा डॉक्टरांनी आपल्या गावातील शेतकरी किंवा गरिबांना वाटून टाकावा, त्यातून कळवळ्याची प्रतिमा अधिक उजळून निघेल.
अनेक वृत्तपत्रे जाहिरातीच्या रूपाने कधी आरोग्य तर कधी प्रचार या मोहमयी नावाखाली स्वप्ने विकत असतात. बरे न होणाऱ्या आजारांविषयी भंपक जाहिरातींद्वारे शास्त्रीय पुरावा नसतांना जाहिराततंत्राच्या मार्गाने बाजार करतात. त्या बाजारात एकजण फसला की दुसरा फसतो व नकट्या गुरूंचा संप्रदाय तयार होतो. भारतातील अनेक राष्ट्रविधाते ह्यांच्या नावाचा उल्लेख गर्भसंस्कारांमध्ये कोणी करत असेल तर तो आईच्या मनात सकारात्मकतेचे बीज पेरण्याच्या हेतूने केलेला असतो. ह्याचा अर्थ त्यांच्या मातापित्यांना संस्कार माहीत नव्हता असा होत नाही. आचारवंत, विचारवंत संस्कारक्षम मातापित्यांच्या पोटी उत्तम संतती निर्माण होऊ शकते. त्यात विचारांचा मोठा भाग असतो. विचार हे विकत घेता येत नाहीत. अर्थात अॅलोपॅथिक डॉक्टरांच्या दुकानांमध्ये समुपदेशन फुकट मिळत नाही आणि ते त्यांना परवडतही नाही. आचारसंहिता व नीतीनियम न पाळणारे, समव्यावसायिकांकडून पैसे घेणारे महाभाग आम्ही मुंबईमध्ये पाहिले आहेत. एका सर्जनने तर जखमेला घातलेले टाके रुग्णाकडे पैसे नसल्यामुळे उसवून टाकले. ह्याचा अर्थ, सगळेच सर्जन काही तसेच असतात असे नाही. ह्याउलट एका मूत्रविकार तज्ञाने फोलीज कॅथेटर आणण्यासाठी स्वतःच्या खिशातले पैसे देऊन डोळ्यात अश्रू आणले. व्यवसायाचे बाजारीकरण होऊ नये असे मलाही नक्कीच वाटते.
माजी राष्ट्रपती कै. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम ह्यांची पुस्तके डॉक्टरांनी वाचावीत म्हणजे त्यांना कळवळा, तितीक्षा, मायाळूपणा, प्रज्ञा, अध्यात्म हे शब्द आकलन होण्यासाठी मदत होईल. भारतातील जेष्ठ नेते, लोकसभेचे माजी सभापती श्री. मनोहर जोशी तसेच प्रथितयश सिने अभिनेत्री जया बच्चन, हेमा मालिनी, रेणुका शहाणे, आदेश बांदेकर, सुकन्या कुलकर्णी तसेच कालनिर्णयकार ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर अशा तज्ञांनी गर्भसंस्कारांविषयी गौरवोद्गार काढलेले आहेत.
डॉक्टर द्वयांच्या भावंडांपैकी काही प्रसिद्ध अॅलोपॅथिक डॉक्टर मुंबईच्या अगदी मध्यवर्ती व मोक्याच्या ठिकाणी ‘गर्भसंस्कार केंद्रे’ चालवितात. ह्यातून त्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन दिसून येतो. नजीकच्या काळात शिशुसंस्कार केंद्रे उघडण्यात येतील, त्यात मुंडनविधि, वर्षावर्धनविधि, लिहिण्याचा विधि, बाळाच्या मेंदूला उत्तेजना देण्याचे तंत्र इ. विधि केंद्रात शिकविले जातील. तेव्हां कळवळ्याची जाती असलेल्या डॉक्टरांनी सुसज्ज राहावे.
मंत्र उच्चार हे एक वेगळे शास्त्र असून डॉक्टर द्वायांच्या विवाह संस्कारांमध्ये यज्ञाच्या वेळी हे मंत्रोच्चार नक्कीच झालेले असावेत. ह्या संदर्भात नासाच्या परीक्षणे दोघांनी अभ्यासावीत. डॉक्टरांनी दिलेली गर्भासंस्कारातील उदाहरणे सकारात्मक दृष्टीने दिलेली असतात त्यामुळे होलिस्टिक रिलॅक्झेशन होते. गर्भसंस्कारांमध्ये गर्भधारणापूर्व समुपदेशन असते. ह्यात लैंगिक शिक्षण, पाळीच्या तक्रारी, पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेतांना येणाऱ्या अडचणी, अनुवांशिक विकारांचे ज्ञान व त्याविषयी शंका समाधान मनमोकळेपणाने केले जाते. त्याचबरोबर विवाहपूर्व समुपदेशन ह्यांसारखे अनेक विषय शास्त्रोक्त पद्धतीने हाताळले जातात. त्यासाठी आयुर्वेदीय संहिता ग्रंथोक्त संदर्भ विचारात घेऊन त्यांना विज्ञानाची जोड दिली जाते.
प्रज्ञावंतांसाठी संदर्भ उद्धृत करीत आहे. –
चरक शारीरस्थान ८/२७ – २८; चरक शारीरस्थान ४/४; सुश्रुत शारीरस्थान २ – ३२; सुश्रुत शारीरस्थान ३/६; अष्टांगहृदय शारीरस्थान १/३७ – ४३; अष्टांगसंग्रह शारीरस्थान १/६८; चक्रदत्त च. वि. ८/१४ असे अनेक संदर्भ देता येतील.
मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे l ज्ञानेश्वरी ३/१७१
आमच्या शास्त्रात सांगितल्याप्रमाणे वागून इतरांना त्याच मार्गाने जाण्यास प्रवृत्त करावे असा ह्याचा मतितार्थ आहे. त्यामुळे आम्हीसुद्धा श्रेयसी प्रजेसाठी संहिताकालीन संदर्भ अभ्यासून विज्ञाननिष्ठ दृष्टीने गर्भिणी स्त्रियांचे समुपदेशन करतो. आमच्या कोणत्याही शहरात “गर्भसंस्कार लेन” नाहीत, किंवा डॉक्टर हाउस सारखे “गर्भसंस्कार हाउस” किंवा “गर्भसंस्कार नर्सिंगहोम्स” नाहीत. जगण्याची लढाई आमच्यापैकी अनेक डॉक्टरांनी १९७२ सालच्या दुष्काळात सुद्धा केली आहे. प्रेरणा आणि सहकार्यामुळे दुर्गम भागातले डॉक्टर राजधानीच्या ठिकाणी स्थिरावले आहेत. १९५६ साली माझ्यावरही गर्भसंस्कार केले नाहीत पण संस्कारित आई-बाबांमुळे शिवाजी, ज्ञानेश्वर, अभिमन्यू, रवींद्रनाथ टागोर, आईनस्टाईन ह्यांच्या विचारांची प्रेरणा मिळाल्यामुळे मी आज येथवर पोहोचलो. अर्धनग्न, अर्धपोटी, अशिक्षित आई-बापापोटी जन्मलेली मुले असो की जन्मपूर्व, गर्भावस्थेत व जन्मानंतर केलेल्या संस्कारांमुळे स्मशानात जळणाऱ्या प्रेताच्या प्रकाशात अभ्यास करून असो, संस्कारांच्या सहाय्याने मनुष्य कर्तृत्वसंपन्न होऊ शकतो, इतिहास घडवू शकतो.
“संस्कार” हा विषय अतिशय गंभीर आहे. त्यासाठी ओशोंच्या विचारांवर आधारित “काम, परमात्म्याची सृजनशक्ती” हा फेसबुक किंवा मराठीसृष्टी.कॉम वरील लेख डॉक्टरांनी विवेकबुद्धीने आवर्जून वाचावा.
गर्भसंस्कारात खालील गोष्टींचा अंतर्भाव होतो.
विवाहापुर्व समुपदेशन संस्कार, बीजसंस्कार, ग र्भाधान संस्कार, आहार संस्कार, मासानुमासिक परिचर्या संस्कार, विहार (समुपदेशन) संस्कार, शृंगार संस्कार, ध्वनिध्यान संस्कार, गर्भसंवाद संस्कार, योगासने व प्राणायाम संस्कार, औषधी गर्भसंस्कार, सूतिका संस्कार, जातकर्म संस्कार ह्याशिवाय जातमात्र परिचर्या, रजस्वला परिचर्या, ऋतुमती परिचर्या इत्यादी गोष्टींचे वर्णन शास्त्रात आढळते.
झी २४ तास वाहिनीवर दि. १९ सप्टेंबर रोजी ‘ज्योतिष आणि गर्भजनन मंत्रोच्चार’ विषयावर सखोल मार्गदर्शन केले आहे. डॉक्टरांनी यूट्यूब किंवा इतरत्र हा कार्यक्रम पाहण्याचा प्रयत्न करावा.
गर्भसंस्कार आवश्यकता –
आजच्या दैनंदिन धावपळीच्या जीवनात खालील गोष्टींचे प्रमाण वाढत आहे.
वारंवार गर्भपात होणे, जन्मजात विकृतींचे वाढते प्रमाण, वाढते अनुवांशिक विकार, लहान मुलांचे मानसिक व्याधी तसेच इतर आजारांचे वाढते प्रमाण ह्या समस्यांवर “औषधी गर्भसंस्कारांद्वारे” उपाययोजना करता येऊ शकते.
गर्भावस्था का?
गर्भाचे पोषण मातेच्या रसापासून होते. आई काय बोलते, काय ऐकते, कसे वागते, काय खाते, काय पिते त्यानुसार परिणाम त्याचे परिणाम गर्भावर होतात.
गर्भाचे मन हे आई-वडिलांच्या मनाशी युक्त असते. गर्भिणी स्त्री ज्याप्रकारच्या कथा वार्ता ऐकेल त्यानुसार बाळाचे मन घडते. एकचित्त होऊन जे ती ऐकते त्यानुसार बाळाचे मन घडते. मातेच्या मानसिक अवस्थेचा परिणाम गर्भाच्या वाढीवर आणि योग्य वेळी प्रसूती होण्यासाठी कारणीभूत असतो असे सिद्ध झाले आहे. ह्यातून सिद्ध होते की आईची जीवनशैली, स्वतःचे संचित, आई-वडिलांचे गुणदोष आणि गर्भावस्थेतील उपचार ह्यांचा परिणाम अपत्यावर होतो.
बाळाच्या मेंदूचा ६० ते ७०% विकास गर्भावस्थेतच होतो व उरलेला जन्मानंतर पहिल्या ५ वर्षात होतो. बीज रुपात असलेल्या पुरुष व स्त्रीबीजापासून २.५ ते ३ किलो वजनाचे बाळ जन्माला येते. म्हणजेच गर्भाची सर्वात जास्त वाढ गर्भावस्थेतच होते.
गर्भसंस्कार म्हणजे काय?
निरोगी, सर्वगुणसंपन्न, उत्तम शारीरिक, मानसिक व बौद्धिक क्षमता, मनोवांछित संतति व्हावी ह्यासाठी गर्भधारणेपूर्वी व सगर्भावस्थेत केल्या जाणाऱ्या सर्व उपचारांना गर्भसंस्कार म्हणतात. तसेच बाळ जन्मल्यानंतर ५ वर्षांपर्यंत त्याची वाढ झपाट्याने होत असते. त्यावेळी करण्यासाठी अनेक संस्कार आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये वर्णन केले आहेत.
श्रेयसी प्रजा – पुराणांचा संदेश . . .
आपल्या वंशामध्ये पूर्वीपेक्षा श्रेष्ठ वारस जन्माला यावा ही सृष्टीची इच्छा आहे, एवढेच नव्हे तर निसर्गही त्यासाठी धडपडत असतो. डार्विनच्या सिद्धांतानुसार प्रत्येक प्राण्यामध्ये पुढील वंश चांगला व्हावा ह्याची ओढ असते. आपल्या विलक्षण बुद्धिसामर्थ्याने मनुष्याने वेगवेगळ्या क्षेत्रात घेतलेली ही जणू गरुडझेपच आहे. मात्र ह्या खटपटीत नैतिक, बौद्धिक, अध्यात्मिक दृष्ट्या पवित्र राहून तमोगुणादि विकारांपासून मुक्त होऊन निस्वार्थ भावनेने प्राणीमात्रांचे कल्याण चिंतणाऱ्या मूळ मानवी प्रवृत्तीचा ह्रास होत गेला. परिणामी, व्यभिचारी, दुराचारी, संकुचित वृत्तीचा एक प्रचंड जनसमुदाय पृथ्वीवर जगत आहे. ह्याच वेगाने अध्यात्मिक व वैचारिक अधोगतीला जाणारा हा समुदाय भविष्यकाळात ह्या सृष्टीचे रक्षण करू शकेल का? अशी भयावह परिस्थिती आज निर्माण झाली आहे. ह्या भीतीला दूर करून नव्या दृष्टीने, नव्या पद्धतीने, गतकाळातील आदर्श विचारांचा नवा समाज निर्माण करण्यासाठी वेद पुराणातील उपदेशांचा मागोवा घेणे आवश्यक आहे.
गर्भसंस्कार नावाची संकल्पना समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न आयुर्वेद व अॅलोपॅथिक तज्ञ करीत असले तरीही अपत्यप्राप्तीची इच्छा होण्यापूर्वी वेदपुराणातील घटनांचा मागोवा व त्याचा समग्र अभ्यास करणे हेच श्रेयसी प्रजोत्पादनाचे मूळ रहस्य आहे.
गौतम बुद्ध, श्रीराम, श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी, सम्राट अशोक, भगवान महावीर, संत ज्ञानेश्वर, तुकाराम, सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी इ. विरक्त विचारश्रेणींचे महामानव, अन्यायाच्या विरोधात हातात समशेर उपसलेला वीर शिवबा ह्यांच्या चरित्राचा अभ्यास केला तर ह्यांचा जन्म हा निव्वळ योगायोग नव्हता तर विशिष्ट इप्सित साध्य करण्यासाठी व अखंड मानवजातीचे कल्याण चिंताणाऱ्या विचारश्रेणी असलेल्या दाम्पत्याकडून केल्या गेलेल्या तपसाधनेतून झाला होता.
प्रजनन व संतती निर्माण ह्यातील फरक –
सर्व जाती, धर्म, पंथांची व सर्व सामाजिक आर्थिक व बौद्धिक स्तरातील माणसे समविचारी नाहीत किंबहुना आध्यात्मिक, वैचारिकदृष्ट्या बहुसंख्य गण अजूनही मागासलेले आहेत. मग अशा लोकांनी संतती जननाचे वैश्विक प्रयोजन ज्ञात असेल का? स्त्रीरोग व प्रसूती विषयाच्या चिकित्सक म्हणून काम करीत असतांना बहुतांश दांपत्य ही अनियोजित प्रणयातून मुले जन्माला घालतात व लोकसंख्या वर्धन करण्याखेरीज समाजाला कसलेही योगदान देत नाहीत असा माझा अनुभव आहे. ह्या प्रक्रियेला प्रजनन म्हणता येईल का? ह्याउलट, पुरण कथांमध्ये कंसाचा वध करून माता-पित्याची बंदिवासातून सुटका करण्यासाठी जन्मलेला भगवान श्रीकृष्ण, गंगापुत्र भीष्माचा संहार करण्यासाठी तपसाधनेने शिखंडीच्या रुपात जन्मलेली अंबा, धर्माचा बाजार मांडून मानवतेची गळचेपी करणाऱ्या धर्ममार्तंडाने जेव्हां विठ्ठल पंतांचा अतोनात छळ केला तेव्हां अशा कर्मठांना खऱ्या धर्मांचे व मानवी जीवनाचे अनमोल मार्गदर्शन करण्यासाठी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणारे संत ज्ञानेश्वर अथवा जुलमी राज्यकर्त्यांच्या पाशवी अत्याचारांचा सूड उगवण्यासाठी जिजाऊने शंभू महादेवांकडून मागून घेतलेला नवसपुत्र शिवबा ! ह्या उदाहरणांकडे पहिले तर हे देखील मनुष्य योनीमध्ये जन्माला आले परंतु त्यांनी आपल्या अलौकिक कर्तृत्वाने जगाला कसे दिपवून टाकले हे सांगण्याची गरज नाही. मग सामान्य माणसापेक्षा त्यांचे वेगळेपण काय? तर हे वेगळेपण म्हणजे त्यांच्या जन्माला येण्याचे काही निश्चित प्रयोजन होते, जे की किडा मुंगी प्रमाणे उठसूट जन्माला येणाऱ्या माणसाच्या बाळांना असतेच असे नाही. अशी योगायोगाने जन्माला आलेली प्रजा म्हणजे ‘संतती’ होय. त्याला श्रेयसी प्रजा म्हणता येत नाही. मात्र विशिष्ट उद्देशाने तपस्वी प्रयत्नांनी व कल्याणकारी चिंतनातून प्रकर्षाने जन्माला घातलेली ‘सुप्रजा’ निर्माण करणे ह्याला प्रजनन किंवा ‘प्रकर्षाने जनन’ असे म्हणता येईल. हा फरक जाणकारांनी समजून घेणे महत्वाचे आहे.
प्रजनन ही बाब नैसर्गिक नसावी –
हे शीर्षक पाहून वाचकांना थोडा भ्रम उत्पन्न होईल. मग थोड्या संयमाने विषय समजून घेतला तर त्याची व्याप्ती लक्षात येईल. संतती निर्माण व प्रजनन ह्यातील भेद आता लक्षात येईल. नैसर्गिकपणा म्हणजे माणसाच्या सहज वागण्यातून व नैसर्गिकपणे असलेल्या स्त्री – पुरुष आकर्षणातून निर्माण झालेली प्रणय प्रक्रिया व त्यातून निर्माण होणारी संतती म्हणजे पुनरुत्पादन होय. अशा अपत्यांच्या जन्माचे प्रयोजन निश्चित असते असे नाही व म्हणून त्यांच्या पासून घडणारी कार्ये देखील विशेष उल्लेखनीय असतील असे नाही. व्यभिचारी वृत्तींमधून किंवा केवळ कामवासनेची तृप्ती करण्यासाठी केलेल्या मैथुनातून निपजलेली प्रजा ही समाजघातक असू शकते. सुसंस्कृत घरातील व उच्चविद्याविभूषित लोकांनी गुन्हेगारी केल्याची उदाहरणे बोटावर मोजण्याएवढी सापडतात. मात्र मूर्ख मातापित्यांच्या निकृष्ट संस्कारातून जन्मलेली मुले बालवयापासूनच कुकर्मे करण्यास प्रवृत्त होतात. अशा बालकांच्या जन्माचे व जन्मानंतरच्या कार्याचे प्रयोजन दाम्पत्याला माहीत नसते म्हणून असा नैसर्गिकपणा श्रेयसी प्रजेचे उद्दिष्ट पूर्ण करू शकत नाही.
सद्गुणी व मेहनती अपत्यप्राप्तीच्या इच्छेखातर सदर दाम्पत्य जेव्हा एखाद्या धार्मिक विधिप्रमाणे शरीर व मनाचे पावित्र्य राखून एकमेकांमध्ये रममाण होतात व स्वतःच्या विकाररहित अवस्थेत श्रेयसी प्रजेच्या उत्पादनार्थ प्रणय करतात तेव्हा त्यास कृत्रिमपणा म्हणावा लागेल. येथे मिलन ही जरी नैसर्गिक आकर्षणाची अवस्था असली तरी अपत्यप्राप्तीचा उद्देश येथे निश्चित असतो व त्यासाठी तपःसाधनेचा खटाटोप असतो. त्यामुळे यशदायी संतती लाभते. ह्या अधिकच्या प्रयत्नांना व कल्याणकारी चिंतनाला कृत्रिमपणा म्हणावा लागेल, जो सर्वांमध्ये सहजपणे नसतो पण कल्याणकारी अपत्य प्राप्तीसाठी जोपासावा लागतो.
मैथुन हा मजेचा विषय नाही –
अपत्य उत्पादनार्थ मैथुन ही अनिवार्य बाब असली तरीही श्रेयसी प्रजोत्पादनासाठी मैथुन ही क्रिया सर्वस्व नाही. श्रेयसी प्रजेच्या प्राप्तीसाठी आवश्यक असणाऱ्या अनेक बाबींपैकी ती एक पायरी आहे. कदाचित इतर पायऱ्यांहून तिचे महत्व वेगळे असेल पण यशाचे शिखर सर करण्यासाठी सर्व पायऱ्या सर कराव्याच लागतात. पुराणामध्ये मुळात केवळ अपत्यप्राप्तीसाठी इच्छेपोटीच मैथुन करण्याची उदाहरणे सापडतात. पशु-पक्षांमध्ये केवळ विशिष्ट हंगामात नर-मादी एकत्र येतात व एकदा गर्भधारणा झाली की पुन्हा प्रणय हा विषय पिल्लांच्या जन्मापर्यंतच काय तर दुसरे अपत्य प्राप्त करण्यापर्यंत अवलंबला जात नाही. मध्यंतरीच्या काळात ते नर मादी एकत्र असले तरी मैथुन मात्र करीत नाहीत. फक्त मानव सोडला तर जगातला कोणताही पशु सदानकदा मैथुन करीत नाही. हे मानवाचे पशुपेक्षा अधिक विकसित (?) असण्याचे प्रधान लक्षण आहे. हा मुद्दा जरी वाचकांना संभ्रमात टाकणारा असला तरी मनुष्य हा किती वासनिक आहे हे सत्य लपू शकत नाही. कलियुगातील माणूस जसा विविध विकारांच्या आहारी जाऊन त्याचे समर्थन करतो तसे ह्या प्रणय वासनेचेही करेल. पण पुराणांना ते मान्य नाही. केवळ मजेसाठी वा इंद्रियांच्या तृप्तीसाठी केलेला प्रणय हा उत्कृष्ट संतान निर्माण करू शकत नाही. मनोवांछित संततीची लालसा बाळगणाऱ्या दाम्पत्यांनी मैथुनाचे नियोजन करणे हे महत्वाचे आहे. त्यासाठी यथायोग्य विहित नमुन्यातील नियमांचे पालन करावे हा पुराणांचा संदेश आहे.
प्रणयातून साधना –
प्रणय हा मजेचा विषय नसून प्रजननाचा पाया आहे. कारण प्रत्यक्ष मैथुन प्रसंगी असणारे दाम्पत्याचे विचार, आचार, इच्छा कृती, भाव, स्वास्थ्य, मनोनिग्रह, मनोबल, देहबल इ. अनेक बाबी जशाच्यातशा अपत्यामध्ये येतात. नियोग पद्धतीने व्यासांच्या वराने भीष्माकडून गर्भवती होतांना एका स्त्रीने आपले डोळे त्याच्या तेजाला पाहून मिटून घेतले व तिच्या पोटी जन्मलेला धृतराष्ट्र हा जन्मांध राहिला. तशाच पद्धतीने दुसरी स्त्री व्यासांचे तेज पाहून निस्तेज झाली व तिच्या उदरी जन्मलेला पुत्र पांडु हा पंडुत्व ह्या आजाराने ग्रासला. राक्षस कुळातील हिरण्यकश्यपु दैत्याने दैत्य कुळाची शोभा वाढवणारा पुत्र व्हावा अशी अपेक्षा केली. मात्र ती स्त्री प्रणयप्रसंगी नारदमुनींचे चिंतन करीत होती. तिच्या चांगुलपणाने भक्त प्रल्हाद जन्माला आला. ह्या उदाहरणांकडे मनोरंजनाच्या कथा म्हणून न पाहता ज्ञानी माणसाने अभ्यास करणे आवश्यक आहे.
आयुर्वेदामध्ये गर्भाधानविधि पूर्वी शुचिर्भूत होणे, मंगल स्वस्ति वाचन करणे, श्वेत वस्त्र घालणे, फुलांच्या माळा घालणे, ईश्वर आराधना करणे वर्णन केलेले आहे. ह्याचा विचार केला तर प्रणय हा साधनेमध्ये व्यत्यय उत्पन्न करीत नाही तर प्रणयातून प्रजोत्पादनासाठी साधना आवश्यक आहे.
उपसंहार –
श्रेयसी प्रजोत्पादनासाठी पुराणांचा अभ्यास करणे हे निश्चितच सोपे काम नाही. ह्याशिवाय बदलत्या जीवनशैलीच्या व पाश्चात्यांच्या बिनबुडाच्या संस्कृतीचा उदोउदो करणाऱ्या जनसामान्यांना ह्या विषयाची गंभीरता व महत्व पटेल अशी अपेक्षा करणे ही व्यर्थ आहे. परंतु पाश्चात्य वैज्ञानिक व विज्ञान युगात वावणारे तज्ञ जर ‘श्रेयस’ समाज निर्माणाचे स्वप्न दूर नाही. आजकालची तरुण पिढी बहुतांश बाबींचे नियोजन अगोदरपासूनच करतात ही चांगली बाब आहे. पण त्याचबरोबर वेद, शास्त्र, पुरण व आयुर्वेद ह्यांच्या उपदेशांचा विचार करून उत्तम प्रजा निर्मितीचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगणे उचित ठरेल. येथे केवळ गर्भधारणापर्यंतच्या काळाशी संबंधित विचार प्रस्तुत केला आहे. गतकाळातील घटनांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या विषयाची व्याप्ती खूप मोठी असून एका लेखामध्ये एवढा विस्तार सामावणे अशक्यप्राय आहे.
लेखक – प्रा. वैद्य सुभाष मार्लेवार
M.D. Ayurved (Gyn & Obs)
सहयोगी प्राध्यापक,
पोदार वैद्यक महाविद्यालय व रुग्णालय,
वरळी, मुंबई
भ्रमणध्वनी - +917738086299/ +919819686299
ईमेल – subhashmarlewar@gmail.com

No comments:

Post a Comment

Visit Our Page