Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Sunday, November 15, 2015

अबीज रजःप्रवृत्ती (Anovulatory cycle) व संशोधनात्मक उपचार

अबीज रजःप्रवृत्ती (Anovulatory cycle) व संशोधनात्मक उपचार

स्त्री हि मूलमपत्यानां स्त्री हि रक्षति रक्षिता।
सर्वाश्रमाणां प्रथमं गृहस्थत्वमनिन्दितम्॥ . . . . अष्टांगसंग्रह २/४०
स्त्री ही अपत्य प्राप्तीचे मूळ असले तरी आजच्या काळात बऱ्याच स्त्रिया अपत्य सुखापासून वंचित राहतात असे निदर्शनास येते. वर्षभर सातत्याने प्रयत्न करूनही मूल न होण्याला ‘वंध्यत्व’ म्हणतात. आयुर्वेदातील विविध संहिता ग्रंथांतून वंध्यत्व विषयावर विस्तृत वर्णन केलेले आहे.
ध्रुवं चतुर्णां सान्निध्याद्गर्भः स्याद्विधिपूर्वकम् |
ऋतुक्षेत्राम्बुबीजानां सामग्र्यादङ्कुरो यथा || . . . . सुश्रुत शारीर ३/२३
शास्त्राप्रमाणे गर्भधारणेसाठी चार गोष्टींची आवशकता असते.
गर्भोत्पत्तिसाठी योग्य कालावधि रजस्त्रावानंतरचा १२ ते १६ दिवसांचा असतो. गर्भाची उत्पत्ती व वाढ जेथे होणार ते गर्भाशय दोषरहित व सर्वगुणसंपन्न असे स्त्रीबीज व पुरुषबीज ह्या सर्वांच्या पोषणासाठी प्रसादरूप असा उपधातु ‘रज’ आहे.
ह्या चारही गोष्टी प्राकृत व दोषरहित असतील तर निसर्गाच्या नियमानुसार गर्भोत्पत्ती होते. पुरुषबीज विकृत असले व स्त्रीबीज प्राकृत असले तरीही गर्भोत्पत्ती होत नाही त्याचप्रमाणे पुरुषबीज प्राकृत असले व स्त्रीबीज विकृत असले तरीही गर्भोत्पत्ती होत नाही. अर्थात दोन्ही बीज सुदृढ असणे आवश्यक आहे.
ज्याप्रमाणे उत्तम असलेले बीज पेरले तर फळही उत्तम येते. त्याचप्रमाणे बीज (स्त्रीबीज, पुरुषबीज) उत्तम प्रतीचे असेल तर गर्भ हा चांगलाच निपजतो. वंध्यत्वाच्या अनेक कारणांपैकी एक म्हणजे स्त्रीबीजाचा अभाव किंवा स्त्रीबीजाचा उत्सर्गच न होणे, म्हणजेच (Anovulation) अबीजोत्सर्ग जो ५० ते ७३% अनपत्यतेला कारणीभूत आहे.
स्त्रीच्या आरोग्याचा विचार करतांना काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. स्त्रीही अनेक ठिकाणी आपला ठसा उमटवत आहे. शिक्षण, नोकरी, राजकारण, समाजकारण, खेळ अशा कोणत्याही बाबतीत पुरुषांच्या तुलनेत स्त्री मागे नाही. ह्याशिवाय प्रजननाच्या दृष्टीने स्त्रीवर जबाबदाऱ्यांचे ओझेही वाढत चालले आहे. त्याचा परिणाम स्त्रीच्या शरीरस्वास्थ्य व मनस्वास्थ्यावर होतो. कार्यबाहुल्य, महत्वकांक्षा, जबाबदाऱ्या ह्या बरोबरच आज पाश्चात्य जगताच्या अनुकरणाच्या नावाखाली आपणच आपले संपूर्ण राहणीमान, जीवनमान बदलून टाकले आहे. त्यातूनच बदलेल्या खाण्यापिण्याच्या सवयी ह्यामुळे अलीकडच्या काळात विविध रोगांचे प्रमाण वाढत आहे. ह्या अशाच जीवनमान बदलातून होणाऱ्या व्याधींपैकी (Lifestyle disorders) अबीज रजःप्रवृत्ती (Anovulatory cycle) ह्या व्याधीचे प्रमाण वाढत आहे.
मासिक रजःस्त्राव सुरु झाल्यापासून सुरुवातीचे काही महिने मासिक रजःस्त्राव अनियमित असणे ही प्रकृती असते. पण स्त्रीबीज निर्मितीस सुरुवात झाली की मात्र हा मासिक रजःस्त्राव नियमित प्रतिमाह येणे आवश्यक असते.
अनियमित मासिक रजःस्त्रावामुळे अपत्यप्राप्ती होत नाही व इतर लक्षणे देखिल स्त्री स्वास्थ्यावर दिसून येतात. उदा. स्थौल्य, उदरवृद्धी, शोथ, उच्चरक्तदाब, आम्लपित्त प्रमेह इ.
रजः प्रसेकान्नारीणां मासि मासि विशुध्यती |
सर्व शरीरं दोषाश्च न प्रमेहन्त्यत: स्त्रिया || . . . . . सु. नि. ६|३
मासिक रजःस्त्रावात अनियमितता असेल, अल्पता असेल तर गर्भधारणा होऊ शकत नाही.
सुश्रुताचार्यांनी आर्तवक्षयाची संप्राप्ती व लक्षणे सांगितली आहेत.
आर्तवक्षये यथोचितकालदर्शननिमल्पता व योनिवेदना च | सु. सु. १५|१२
प्राकृत प्रमाणात रजस्त्राव न होणे, अनियमित रजःस्त्राव, अल्पप्रमाणात रजःस्त्राव होणे. ह्यावर आधुनिक शास्त्रात Hormonal therapy दिली जाते. व हि Hormonal therapy चालू असे पर्यंत मासिक रजःस्त्रावामध्ये नियमितता असते. औषधी बंद केल्यास ती अनियमितता पुन्हा सुरु होते. ह्याठिकाणी संप्राप्ती लक्षात घेऊन चिकित्सा करावी. समानाने समानाची वृद्धी ह्या सिद्धांतानुसार चिकित्सा करावी.
तत्रसंशोधनमाग्नेयानां च द्रव्याणां विविधादुपयोग: | सु. सु. १५|१६
स्वयोनि अर्थात “आर्तवं तु आग्नेयम्” | आर्तव हे आग्नेय गुणात्मक असल्यामुळे संशोधनानंतर आग्नेय गुणात्मक द्रव्यांची योजना करावी. स्त्री शरीरातील हे आग्नेय तत्व स्त्री सुलभ लक्षणांचा विकास करत असते. पाचक-पित्त हे आग्नेय तत्व वाढविण्यास मदत करते.
अशा प्रकारे आग्नेय तत्वाच्या विकृतीच्या परिणामी होणारा मासिक रजःस्त्राव “आग्नेयानां च द्रव्याणां विविधदुपयोग:” | ह्या चिकित्सासूत्रानुसार नियमित करता येतो .
अबीजोत्सर्गाची संप्राप्ती बघता संग, वातसंक्षोभ व धातुक्षय होतो व हा संप्राप्ती भंग होण्यासाठी दीपन, पाचन व अनुलोमन करणारे द्रव्य किंवा औषधीचा वापर करावा.
ह्यासाठीच काश्यपसंहितेत शतावरी व शतपुष्पा उपयोगी असल्याचे संदर्भ आहेत. कल्पाध्यायात शतपुष्पा ही पुष्टी, वर्ण, अग्निवर्धक ऋतुप्रवर्तक आणि शुक्रविशोधनी सांगितली आहे.
मधुरा वृह्णी बल्या पुष्टी वर्णाग्नीवर्धनी |
ऋतुप्रवर्तती श्रन्या योनिशुक्रविशोधनी ||
उष्णावात प्रशयनी मंगल्यापापनाशनी |
पुत्रपदा वीर्यकरी शतपुष्पा निदर्शता || . . . . . काश्यप कल्पस्थान
शतपुष्पा शतावरी कल्प :
शतपुष्पाच्या आग्नेय गुणाचा विचार करून चिकित्सा सिद्धान्ताप्रमाणे शुतपुष्पाचा उपयोग अबीज रजःप्रवृत्तीमध्ये अतिशय उत्कृष्ट रीतीने होतो.
शतपुष्पा चुर्णास जेष्ठमध व शतपुष्पा कषायाच्या भावना देऊन वटी बनवली आणि दररोज अपानकाली अर्धापत्य प्रमाणात रुग्णेस दिली. त्याचबरोबर योगबस्तीसाठी शतपुष्पा कषाय व शतपुष्पातैल ह्याच्या अनुक्रमे निरूह व अनुवासन बस्तीसाठी तीन महिने उपयोग केला. योगबस्ती हा प्रत्येक महिन्याच्या मासिक पाळीनंतर सात दिवस दिला.
त्याचसोबतच काश्यपांनी शतपुष्पा नस्याचा उपयोग करण्यास सांगितला आहे.
शतपुष्पा पलशतं जलद्रोणेषु पज्यसु |
पादावशेष निषकाथ्य पुतं भूयो विपाचयेतु ||
तैलाढ़कं पचेतेन शनै: क्षीरे चतुर्गुणे |
ततू पक्व नस्य पानाघस्नेहस्यक्षणबस्ति च |
प्रशस्तभूषिणा नित्यं यथोत्तगुणलक्ष्यये || . . . . . काश्यप कल्पस्थान
ज्या स्त्रिया नस्य व बस्तीसाठी येऊ शकत नाहीत त्यांना ह्या सूत्रानुसार शतपुष्पा वटी घ्यावयास सांगितल्या. एका ग्रुपमधील स्त्रियांना मासिक पाळीच्या पाचव्या दिवसापासून तीन दिवस नस्य आणि नंतर पुढे आठ दिवस शतपुष्पा कषाय आणि सिद्धूतैल योगबस्ती असा चिकित्सा उपक्रम तीन महिने केला.
ह्या चिकित्सा सिद्धान्ताप्रमाणे शतपुष्पाचा उपयोग अबीज रजःप्रवृत्तीमध्ये (Anovulatory cycle) मध्ये अतिशय उत्कृष्ट रीतीने होतो असे अनुभवास आले.
अबीज रजःप्रवृत्ती (Anovulatory cycle) ह्या विषयावर मी स्वतः संशोधन केले असून एकूण १३६ रुग्णांवर ह्या चिकित्सेचा उत्तम उपशय अनुभवास आहे.
ह्याचबरोबर सकष्टरजः प्रवृत्ती (Dysmenorrhoea), अनियमित रजः प्रवृत्ती (Irregular menses), PCOD ह्या विकारांमध्येही सदर चिकित्सेने उपशय मिळाला असा अनुभव आहे.
अबीज रजःप्रवृत्ती (Anovulatory cycle) मध्ये मेदसंचिती असून वजन कमी करणे अनिवार्य असते. म्हणून वरील चिकित्सेसोबत योगासने, सूर्यनमस्कार, सर्वागासन, पश्चिमोत्तासन, हलासन, प्राणायाम इ. करावीत.
अशाप्रकारे अबीज रजःप्रवृत्तीमध्ये (Anovulatory cycle) मध्ये औषधी चिकित्सा व शोधन चिकित्सा करावी. जो अनुभव आम्हाला आला तो इतरांनाही यावा हीच आशा बाळगून शास्त्रोक्त चिकित्सेचा अनुभव घ्यावा.
लेखक –
प्रा. वैद्य सुभाष मार्लेवार
आयुर्वेद वाचस्पति,
सहयोगी प्राध्यापक,
स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र विभाग,
रा. आ. पोदार वैद्यक महाविद्यालय
मुंबई ४०० ०१८
+917738086299
+919819686299
subhashmarlewar@gmail.com

No comments:

Post a Comment

Visit Our Page