Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Thursday, November 26, 2015

आहारयोग

आहारयोग

लेख क्रमांक 6

नमस्कार!

आहाराचा समयोग साधण्यासाठी म्हणजेच योग्य आहार घेणे व तो पचवून त्याचे पूर्ण फायदे मिळणे यासाठी आयुर्वेदाने 8 गोष्टींचा विचार करायला सांगितले आहे. त्यांना म्हणतात आहारविधिविशेषायतन. थोडक्यात आहाराचा योग्य-अयोग्य विचार करताना तो खालील निकषांवर करावा.
1. प्रकृति
2. करण
3. संयोग
4. राशि
5. देश
6. काल
7. उपयोगसंस्था
8. उपभोक्ता
आयुर्वेद हे शास्त्र शरीर हे एखाद्या यंत्राप्रमाणे काळ-काम-वेग किंवा ऍव्हरेज किती देते मग त्या शरीराला कॅलरीज् किती घालाव्या अशा भाषेत बोलत नाही. मुळात कॅलरीज् ही संकल्पना ही पूर्णतः तर्कशुद्ध वा शास्रीय नाही पण त्याविषयी नंतर कधीतरी. आयुर्वेद हे शरीराला धर्म, अर्थ, काम व मोक्ष मिळविण्याचे साधन मानते. अशा या शरीराचे व मनाचे रोग होऊ नयेत म्हणून योग्य खाणे हे फार फार महत्त्वाचे आहे याविषयी तर आता दुमत नसावे. रोगाच्या चिकित्सेत असे म्हटले आहे की जर पथ्य नीट पाळले गेले तर औषधाची गरजच काय, आणि जर पथ्य पाळायचे नसेल तर औषधाचा उपयोग काय? यावरुनच योग्य खाणे मग ते स्वस्थ माणसाने असो वा रुग्णाने किती महत्त्वाचे आहे हे स्पष्ट आहे. विशेषतः हृद्रोगी वा प्रमेही लोकांचे उदाहरण घ्या बरं. पथ्य पाळलेच नाही आणि फक्त औषधावरच विसंबून राहिले तर चालेल का?
तर या वरील आठ गोष्टींचा थोडक्यात परिचय करून घेऊ.
1. प्रकृति – येथे प्रकृति हा शब्द आहाराशी संबंधित आहे. म्हणजेच पदार्थाचा स्वभाव, थंड/गरमपणा, पचायला जड वा हलकेपणा इ. व्यवहारात आपण नेहमीच बघतो व विचार करतो की सामान्य शाकाहारी जेवणापेक्षा मांसाहारी जेवण पचायला जड असते, गोड पदार्थ तिखट पदार्थांपेक्षा पचायला जड असतात, इ. एकेरी पदार्थांबाबत विचार करताना गहू हा तांदळापेक्षा पचायला जड असतो, मांस हे भाज्यांपेक्षा पचायला जड असते, दुधी, दोडका या भाज्या बटाटे, पनीर इ. पेक्षा पचायला हलक्या व त्रास न करणाऱ्या असतात इ. नेहमीच्या तांदुळापेक्षा साठेसाळी हा तांदूळ पचायला हलका व पथ्यकर असतो इ.
2. करण – करण म्हणजे पदार्थांच्या वर होणारे वेगवेगळे संस्कार. संस्कारांमुळे पदार्थाचे गुणधर्म वाढतात वा कमी होतात किंवा पूर्ण बदलतात ही. उदा. – तांदुळ हे पचायला हलके. त्यातही साळीच्या लाह्या या पचायला भातापेक्षाही हलक्या. पण चुरमुरे व पोहे, इडली-डोसे इ. तांदुळाचे पदार्थ, तांदुळाच्या पिठाची उकड, विविध भाज्या, धान्ये, मांस इ. घालून केलेले पुलाव वा बिर्याणी इ. सर्व पचायला जड असतात. तेव्हा पथ्याचे पदार्थ म्हणताना रुग्ण व रोगानुसार विचार करणे महत्त्वाचे. पथ्य म्हटल्यावर सरसकट इडली पचायला हलकी वा तांदुळाची उकड चालेल असे म्हणणे बरोबर नाही. किंवा दूध आवडत नाही तर दही खा वा ताक प्या वा पनीर खा हे म्हणणेही बरोबर नाही. विशेषतः दही हे सूज वाढवणारे आहे तर ताक हे सूज कमी करणारे आहे. दह्यातील हा बदल ते घुसळल्यामुळे व पाणी घातल्याने होतो. आधुनिक आहारशास्त्रानुसार यात पाण्याखेरीज काहीच घातले नाही इतपतच मर्यादित विचार आहे आणि म्हणूनच त्यांच्या मते दही वा ताक दोन्हीही सारखेच.
तसेच कच्चे अन्न खाण्यापेक्षा त्यावर अग्निसंस्कार झालेले अन्न पचायला तुलनेने हलके असते. चुलीवरचे अन्न, उकडलेले अन्न, विस्तवावर प्रत्यक्ष अग्निवर ठेवून शिजवलेले अन्न, मायक्रोव्हेवमध्ये शिजवलेले अन्न अशा अनेक प्रकारे शिजवलेल्या अन्नाचे गुण वेगवेगळे व परिणाम ही वेगवेगळे. तसेच भाजलेले, उकडलेले, तळलेले, कच्चे इ. प्रत्येक प्रकारात अन्नाचे गुण बदलतात. म्हणून केवळ दुधी हा हृद्रोग्यासाठी हितकर असे म्हणून ज्यात-त्यात व कशाहीप्रकारे शिजवलेला दुधी खाऊन चालणार नाही. पारंपारिक बिन मसाल्याची भाजी न करता दुधीचे कोफ्ते, पुऱ्या, पराठे, हलवा, पावभाजी इ. अनेक प्रकारे खालेल्ल्या दुधीचे परिणाम हवे तसे मिळणार नाहीत, फक्त मानसिक समाधान (खोटे) मिळेल.
3. संयोग – संयोग म्हणजे पदार्थांचे एकत्रिकरण. जसे कच्चे पोहे व दूध हा संयोग. पोहे हे दूध-साखरेबरोबर खाल्ले असता उत्तम बलदायक आहेत. तसेच पोह्याचे अजीर्ण झाले असता दूध प्यायल्यानेही पोहे पचायला व त्याचे अजीर्ण कमी व्हायला मदत होते. याउलट दूध व आबंट पदार्थ, फळे, तिखटमिठाच्या पदार्थासोबत खाणे हा विपरीत संयोग. याने दोष वाढून रोगनिर्मितीला वाव मिळतो. तसेच दही व चिकन, मासे व दूध, मध गरम करणे वा गरम पदार्थासोबत खाणे वा गरम पाण्यात घालून पिणे हे विकृतच.
4. राशि – म्हणजे प्रमाण. पदार्थाचे वा आहारचे प्रमाण हे व्यक्तिसापेक्ष बदलते. जेवणातील प्रत्येक घटकाचे प्रमाण व संपूर्ण जेवणाचे प्रमाण या दोन्हीचा विचार करणे महत्त्वाचे आहे. सरसकट वयोमानानुसार किती खावे असे न सांगता भुकेप्रमाणे व पचनशक्तिप्रमाणे खावे हे उत्तम. तसेच आपल्या पांरपारिक जेवणात मुख्य धान्य गहू, तांदूळ, क्वचित ज्वारी हे असते व त्याला डाळींची, भाज्यांची जोड दिलेली असते. लोणचे-चटण्या या चव वाढविण्यासाठी, अन्न पचायला मदत करण्यासाठी असतात. पण म्हणून भाजी चिमूटभर व लोणचे वाटीभर असेतर आपण जेवत नाही व तसे जेवूही नये. चमचाभर ठेचा वा लोणच्याबरोबर पूर्ण जेवण संपवणारी माणसे आहेत, पण हे योग्य नाही.
(क्रमशः)
© वैद्य तनुजा गोखले,
पुणे.
tanugokhale@gmail.com
skype ID - tanugokhale
twitter handle - tanugokhale
संपर्क - 9765383735

No comments:

Post a Comment

Visit Our Page