Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Wednesday, December 30, 2015

आपण खातो ते अन्न किती सुरक्षित

आपण खातो ते अन्न किती सुरक्षित

आपण खातो ते अन्न किती सुरक्षित याबाबतीत विचार करताना तीन बाबींचा विचार हवा आहे.
१) कच्चामाल उत्पादनातील अवस्था
२) कच्च्या मालातून पक्का माल तयार होताना त्याची अवस्था
३) पक्क्या मालाचे वितरण होतानाची अवस्था
१) रासायनिक खते-कीटकनाशकांचा वापर धोकादायक
भारतातील अन्नधान्याचा विचार केला असता भारत देशाने अन्नधान्य उत्पादन क्षेत्रात अत्यंत प्रगती केलेली आहे. भारतात अन्नधान्याचे प्रचंड उत्पादन होत असते; परंतु धान्य पिकवताना शेतामध्ये रासायनिक खते व कीटकनाशकांचा अमर्याद वापर केला जातो. कोणत्याही प्रमाणाशिवाय कीटकनाशके व खतांचा वापर केला जातो. यामुळे या कीटकनाशकांचा, रसायनांचा प्रवेश अन्नधान्यांच्या माध्यमातून आपल्या शरीरात होत असतो. हॉटेलमध्ये किंवा बाहेर उघड्यावर, चौपटीवर खाण्याची संस्कृती भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रुजलेली आहे. दररोज हजारो लोक उघड्यावरील अन्नपदार्थ खात असतात. हे अन्नपदार्थ बनविणा‍-यांचे आरोग्य, त्यांचे स्वयंपाकघर त्यात वापरले जाणारे पदार्थ याची तपासणी करणारी यंत्रणाच आपल्याकडे नाही. लग्न, इतर समारंभ यात सतत जेवणाच्या पंगती उठत असतात. सकाळच्या चहासोबत बेकरीचे पदार्थ भारतामध्ये आवडीने खाल्ले जातात. आपल्या देशांत भाजीपाला उघड्याने रस्त्याच्या कडेला विकला जातो तर चपला बूट एसी दुकानात विकले जातात. ही शोकांतिका आहे.
२) चवीमुळे गाड्यांवर, अस्वच्छ खाणे विषबाधेस कारण
हॉटेलमध्ये, गाड्यावर खाताना पदार्थांची फक्त चव पाहिली जाते ते कसे बनवले जातात ते नाही. स्वयंपाकघर अस्वच्छ कर्मचारी तसेच अस्वच्छ भांडी असतात. शिवाय स्वयंपाक बनवणारे, दारू पिऊन तंबाखू चघळत, अपु-या जागेत घामाच्या धारात पदार्थ बनवणे सुरू असते. अन्नधान्य -भाज्यांची सफाई, धुलाई न करताच त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे मग आपल्याला अन्न विषबाधेमुळे लोकांना त्रास झाला. अशा बातम्या महिन्यातून एकदा तरी वाचाव्या लागतात. रुग्ण डॉक्टरकडे आल्यावर स्वत:च सांगतो की मी काल-परवा बाहेर गाड्यांवर खाल्ले होते त्यामुळे जुलाब होत आहे, उलटी होत आहे, पोट दुखत आहे. बाहेर गाड्यांवर वा इतर ठिकाणी कोणत्या तेलात भजे, वडापाव तळतात हे पाहायला हवे.
३) अस्वच्छ, अशुद्ध पिण्याचे पाणी
याशिवाय पिण्याच्या पाण्याचेही तेच हाल असतात. अनेक ठिकाणी हॉटेलमधील अन्न साठवणीचे ठिकाणही अत्यंत गलिच्छ असते. कित्येक ठिकाणी झुरळे उंदरांचा सुळसुळाट असतो. याशिवाय पिण्याच्या पाण्याचे हाल अत्यंत वाईट असतात. पाण्याच्या टाक्या वर्षानुवर्षे धुतल्या जात नाहीत. त्या निर्जंतुक केल्या जात नाहीत. पाणी साठविण्याच्या पद्धती किंवा पाणी शुद्धीकरणाच्या पद्धती अत्यंत जुनाट आहेत.
४) पदार्थांत सोडा, रंग, भेसळीचे पदार्थांचा वापर
अन्न पदार्थांमध्ये सोडा, प्रिझर्वेटिव्ह, रंग वापरण्याचे काहीही नियम नाहीत किंवा प्रमाण नाही. सध्या सर्व काही रेडिमेड वापरण्याकडे कल आहे. भेसळयुक्त लाल तिखट, भेसळयुक्त हळद, रंग दिलेली बडीसोप, रंग मिसळलेली चहापत्ती हे प्रकार आता नित्याचेच झाले आहेत. आपल्याकडे काळीमिरीच्या ठिकाणी पपयाच्या बिया मिसळतात. केशरच्या ठिकाणी रंग दिलेल्या मक्याचे केस मिळतात. दिवाळी -दसरा अशा सणांच्या वेळेस खवा हा पूर्णपणे भेसळयुक्तच असतो. अन्न प्रशासनाने भेसळयुक्त खवा जप्त केला. सणासमारंभाच्या काळात वापरण्यात येणारे तेल-तूप-डालडादेखील बहुतांशी भेसळयुक्तच असते.
५) खवा, मिठाई, दुधातही भेसळीने दूध विषारी
भारतात बहुतांशी दूध हा आहारातील मुख्य घटक आहे. मात्र या दुधातही एका लिटर दुधामागे २ लिटर इतकी पाण्याची भेसळ असते. गायी-म्हशी-शेळ्यांना केमिकलची इंजेक्शन्स देऊन दुधाची मात्रा वाढविली जाते. उन्हाळ्याच्या काळात दुधामध्ये दूधपावडर मिसळून विकले जाते. रेल्वे स्टेशन, बसस्थानक या ठिकाणी उघड्यावर, धुळीत चहा तयार होतो.
६) फळांना रंगाचे वा अतिगोडीसाठी सॅकरीनचे इंजेक्शन
भेसळीत फळेदेखील सुटत नाहीत, टरबुजास रंगाचे व साखरेच्या द्रवणाचे इंजेक्शन देऊन ते लाल व गोड बनविले जातात. आंबे-केळी-चिक्कू ही अत्यंत विषारी केमिकलद्वारे पिकवले जातात. सफरचंदास वॅक्स लावून त्यास चमकवले जाते.
७) पालेभाज्यांनादेखील हिरवा रंग
पालेभाज्यांनादेखील हिरवा रंग दिला जातो. हॉटेलमधील प्रत्येक मिठायामध्ये आजकाल साखरेऐवजी सॅकरीन नावाचा विषारी साखरेपेक्षा १००० पट गोड पदार्थ वापरतात.
८) उघड्यावरील मासंविक्री अनारोग्यास निमंत्रण
मांसाहारामध्येदेखील कोणत्याही जनावरांची तपासणी झालेली नसते, आजारी-अशक्त जनावरे उघड्यावर कापली जातात व उघड्यावर व उघड्यावर रस्त्याच्या कडेला मांस-मासोळी विकली जाते.
९) असुरक्षित अन्नप्रक्रियाने उलटी, जुलाब, साथरोग
याप्रमाणे अत्यंत असुरक्षितरीत्या अन्नधान्यांचे -खाण्याच्या पदार्थांचे उत्पादन केले जाते, त्याची वाहतूक-त्याची साठवणदेखील असुरक्षित असते.
सर्वसामान्य नागरिकांसाठी केली जाणारी अन्नप्रक्रियादेखील असुरक्षित पद्धतीची असते. अशा दूषित, रसायनयुक्त आहाराच्या सेवनाने जुलाब उलटी, अतिसार, पचनाचे विकार, कावीळ, कॉलरा, क्षय, विविध प्रकारच्या अ‍ॅलर्जी, त्वचारोग, टॉयफाईड यासारखे जीवघेणे आजार होतात. कित्येकदा सामूहिक अन्न विषबाधा होणे, संपूर्ण गावात काविळीची साथ येणे, उलटीजुलाबाची साथ येणे असे प्रकार भारतात नित्याचेच आहेत.
डॉ. पवन लड्डा
लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय, लातूर
मोबा. ०९३२६५ ११६८१

No comments:

Post a Comment

Visit Our Page