Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Wednesday, June 1, 2016

आरोग्य सूत्रम्

* *आरोग्यसूत्रम्-२* *
दि. १ जून २०१६

आहार आणि विहार या दोघांचाही एकत्र विचार केला तर त्याला आयुर्वेदाने *“आचारिकम्”* असे संबोधले आहे. *आचारिकम् इति आहारविहाराख्यम् ।* सुश्रुतसंहिता सूत्रस्थानम् १६.१५ डह्लण

आहाराबरोबरच तितकाच महत्त्वाचा घटक म्हणजे “विहार”!

विहार म्हणजे शरीराच्या क्षेपण (धावन, गमन, प्लवन, इ.) इत्यादी होणाऱ्या चेष्टा होत. *विहारः अङ्गक्षेपणादिका चेष्टा ।* चरकसंहिता चिकित्सास्थानम् १५.२३९ चक्रपाणिदत्तः

आयुर्वेदाने विशेषतः आचार्य सुश्रुतांनी शरीराच्या कोणत्या हालचाली या नेहमीच पथ्यकारक / आरोग्यरक्षक असतात, याची एक यादीच दिली आहे.
१. ब्रह्मचर्य
२. निवातशयन
३. उष्णोदकस्नान
४. निशास्वप्न
५. व्यायाम
हे पाच प्रकारचे विहार हे एकान्ततः म्हणजे नेहमीच पथ्यकारक आहेत.

स्वास्थ्य टिकविण्यासाठी या गोष्टी नियमित आचराव्या अशा आहेत. त्याने शरीरातील दोषांची वाढ न होता, उलटपक्षी दोष समप्रमाणात राहून शरीरातील सप्तधातूंना बळ मिळून स्वास्थ्यलाभ होतो.

*ब्रह्मचर्य* - ब्रह्मतत्त्व जाणून घेण्यासाठी करावयाचे आचरण. यात सर्व वैयक्तिक, सामाजिक, इ. नीतिमूल्यांचा समावेश होतो. केवळ स्वस्त्रीशी प्रजा उत्पन्न करण्यापुरते शरीरसंबंध आणि अन्य समयी ब्रह्मतत्त्वाचे चिंतन, असे याचे शास्त्राला अपेक्षित असलेले स्वरूप आहे.

*निवातशयन* - दिवसा झोपू नये आणि रात्री जागरण करु नये; हा आयुर्वेदाचा नियम एव्हाना सर्वश्रुत झालेला नियम आहे. ही झोप सुद्धा जिथे वारे वहात नाहीत, साक्षात् अंगावर वारा येणार नाही, परंतु सुयोग्य वायुवीजन होते, अशा गृहात घ्यावी; असे यातून सुचवावयाचे आहे. हल्ली फॅन लावून अगदी फॅनखाली झोपणारे, ए.सी. लावून झोपणारे, याशिवाय कारमधून प्रवास करताना सर्रास ए.सी. लावणारे महाभाग आढळतात. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात थंडाव्याचे सेवन करणे, आयुर्वेदानुसार वात वाढविण्यास कारणीभूत ठरते.

*उष्णोदकस्नान*- मुळात स्नान त्रिकाल करावे असे असले तरी किमान दिवसाच्या सुरुवातीला, सुख वाटले इतपत गरम पाण्याने करणे अपेक्षित आहे. अत्यंत कढत पाण्याने ही स्नान करणारी मंडळी आढळतात; त्यातही पुनः स्नानानंतर फॅनखाली उभे राहतात. हे प्रकार पुनः वात वाढविणारे आहेत.
याशिवाय, असेही लोक आढळतात की ज्यांनी आजपर्यंत कधीही उष्णोदकाने स्नान केलेले नाही. त्यांचे असे म्हणणे असते की कितीही थंडी असो मी थंड पाण्यानेच स्नान करतो. कालांतराने हे अतिरेकी प्रकार वातविकारांना कारणीभूत होतात.
स्नान करताना डोक्यावरुन मात्र फार गरम पाणी घेवू नये. खांद्याखाली मात्र सुखोष्ण असे गरम पाणी वापरावे. आचार्यांनी म्हणूनच केवळ स्नान असा शब्द न वापरता “उष्णोदकस्नान” असा शब्द वापरला आहे.

*निशास्वप्न*- दिवसभरात थकवा / शीण जावा व दुसरे दिवशी पुनः प्रसन्नपणे जाग यावी यासाठी रात्री किमान ७ ते ८ तास झोप होणे आवश्यक आहे. रात्री ९ वाजेपर्यंतच (खरे तर सूर्यास्तानंतर घन आहार घेवूच नये!!) हलका आहार घेवून जेवण ते झोपेची वेळ यात किमान दीड तास अंतर ठेवून मगच निद्राधीन व्हावे.

*व्यायाम*- शिस्तबद्ध पद्धतीने शरीर क्षमता वाढविण्यासाठी वाढविण्यासाठी केलेल्या हालचाली म्हणजे व्यायाम !
आम्ही रोज कामाच्या ठिकाणी खूप वेळा जिने चढ-उतार करतो, हाच आमचा व्यायाम! - हा मोठाच गैरसमज आहे. हा व्यायाम नसून श्रम होत. श्रम झाल्यास थकवा येतो तर व्यायामाने उत्साह वाढतो. ज्या व्यायामाने थकवा येतो, तो व्यायाम नसून श्रम आहेत, हे लक्षात घ्यावे.

यातील प्रत्येक मुद्द्याचा विस्तार शास्त्रांत बारकाव्यांसह मांडला आहे. तूर्तास एवढेच !

*वैद्य नीलेश कुलकर्णी*, पुणें
+९१-७७९८६२७८२३ / +९१-८८०५३३५५१२
vd.nilesh@gmail.com

No comments:

Post a Comment

Visit Our Page