Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Thursday, June 2, 2016

#घरोघरी_आयुर्वेद

#घरोघरी_आयुर्वेद

"आयुर्वेदात मानसिक रोगांवर उपचार आहेत का?" एका वाचकांचा प्रश्न. याचे निःसंदिग्ध उत्तर 'हो' असे आहे. मात्र आजकाल सर्वत्र पुरावे लागतात. त्यामुळे ही छोटीशी झलक.

काही व्यक्तींना कितीही आनंदाचा क्षण असला तरी त्यात काही विशेष झाले असे वाटत नाही. आनंदाचाच कशाला? अगदी दुःखाचा क्षण असला तरी ते फारसं मनाला लावून घेत नाहीत. सुख असो वा दुःख; 'ये भी दिन जाएँगे।' अशी त्यांची एकंदरीत भावना असते. विपश्यनेच्या भाषेत सांगायचे झाल्यास ते 'साक्षीभावाने' राहतात. ना आनंद ना दुःख. असे लोक फारच कमी असतात. त्यांना म्हणतात सात्विक.

एखादा विजय प्राप्त झाला की काही लोक अगदी गर्वाने फुलून जातात. आपल्या कष्टाचे चीज झाले असे मानतात. 'जितं मया।' अशी एकंदरीत गत. दुसरीकडे दुःख झाल्यावरही ते खचून जात नाहीत. संकटाच्या छाताडावर पाय देऊन उभी राहण्याची त्यांची प्रवृत्ती असते. स्वभावतःच असलेला 'अहं' या प्रतिक्रियेला कारणीभूत असतो. या व्यक्तींना म्हणतात राजसिक.

काहीजणांना सुख बोचतं असं म्हणतात. असे लोक सगळ्या सुखाच्या वातावरणात आणि सारं काही सुरळीत चालू आहे असं वाटत असतानाच काहीतरी खुसपट काढून ते सारंकाही बिघडवून टाकतात. स्वतःत कुढत बसतात आणि या दुःख उगळण्यालाच सुख मानतात. जणू काही दुःखाशिवाय सुखाचे स्वतंत्र अस्तित्वच नसावे. या व्यक्ती असतात तामसिक.

सत्व, रज आणि तम असे तीन मानसिक गुण आयुर्वेदाने मानले आहेत. अनुक्रमे पित्त, वात आणि कफ प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये हे गुण आधिक्याने दिसतात. विशेष म्हणजे एखादी व्यक्ती सात्विक वा राजसिक वा तामसिक आहे हे कसे ओळखावे याचे वरील मार्गदर्शन अष्टांगहृदय या ग्रंथातील केवळ एका सूत्रात आलेले आहे. जिथे एक सूत्र माणसांच्या स्वभावाच्या ढोबळ वर्गीकरणातदेखील इतके सखोल वर्णन करते तिथे संपूर्ण आयुर्वेदातील मनोरोगांविषयीची माहिती किती असेल याचा अंदाज सहज बांधता यावा. 'मानसोपचारतज्ज्ञ' (त्यांच्या कार्यक्षेत्राबद्दल संपूर्ण आदर राखून) ही जमात अस्तित्वात नव्हती तेव्हापासून आजतागायत विविध मानसिक व्याधींना आयुर्वेद समर्थपणे हाताळत आहे.

© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

(लेखकांचे #घरोघरी_आयुर्वेद हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे.)

No comments:

Post a Comment

Visit Our Page