Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Monday, August 22, 2016

' त्या ' विषयातले 'शास्त्र '

आयुर्वेद कोश ~ ' त्या ' विषयातले 'शास्त्र ' !!

काही दिवसांपूर्वी एक पुस्तक प्रदर्शन पाहायला गेलो होतो . एक मध्यम वयाचा आणि दुसरा तरुण वयाचा मनुष्य संपूर्ण प्रदर्शनाला प्रदक्षिणा करून एका विशिष्ट जागी काही क्षण थांबत होते . सीआयडी , अस्मिता , लहानपणी थरार , तिसरा डोळा अशा सीरिअल आणि 'रॉ , एफ बी आय एजन्ट ' वाले सिनेमे चिक्कार पाहीले असल्याने सतत कोणीतरी आपल्या पाठलागावर आहे असा 'सेन्स ' जागा असतो . त्यामुळे ज्या जागी आपण जाऊ त्या जागेची , तिथल्या माणसांची 'रेकी ' करायची जुनी सवय आहे . स्लीपर सेल मधला एखादा किंवा स्नायपर  टपून बसलाअसेल तर ?? :p असो . . . तर हे दोन व्यक्ती 'त्या ' विशिष्ट जागी जाऊन ,लोकांपासून लपवून काय वाचतात ? हे बघितले तर 'सेक्स ' संदर्भातली काही पुस्तके तिथे होती . . . हि पुस्तके पाहण्याचा 'पेटर्न ' असा की आजूबाजूला कोणी नसताना 5 मिनिट  पुस्तक पाहायचे . .भिरभिरत्या नजरेने इकडे तिकडे पाहायचे . .  गर्दी वाढू लागली की कल्टी मारायची . . गर्दी ओसरली की हजर . .

भारतात सर्वाधिक सुरसकथा कशावर असतील तर त्या सेक्स वर . . मी मुद्दाम सेक्स हा शब्द वापरतोय . याचे कारण सोपे आहे . . काम शास्त्र यात शास्त्र आहे तर सेक्स मध्ये केवळ 'अंधानुकरण ' !! एका वृत्तपत्रात रोज एक सदर 'भारतातील लोक सेक्स याबाबत किती अज्ञानी आहेत ' हे दाखवायला समर्पित असते . त्यातील प्रश्न पाहीले तर फिंगर टीप वर असलेल्या माहितीच्या साठ्यातून (यास सरळ साधा सोपा शब्द मोबाईल ) लोक फक्त मनोरंजन घेतात . भारतात सर्वाधिक सर्च होणारी सेलिब्रिटी . . सनी लिऑन !! हे सर्च करण्यात अत्याधिक वेळ घालवून उरलेला वेळ ते स्टोअर आणि शेअर करण्यात खर्ची घालणारे सेक्स या विषयाबाबत अनेक फँटसि घेऊन फिरत असतात . . .

वृत्तपत्र यातून कसल्या कसल्या 'गोळ्या ' सतत 'ऑन ' राहायचे सल्ले देत असतात . एखाद्या तरुण किंवा तरुणीच्या आयुष्यात 'अजून काहीच नाही ' हा विषय त्या 'सर्कल ' मध्ये थट्टेचा विषय असतो . ज्यांच्या आयुष्यात बरंच काही असतं त्यांना सगळं असूनही असमाधानी आणि अतृप्त फिलिंग असतं . कारण सुखाची व्याख्या जशी आपली आपण शोधायची असते तशी समाधानाची व्याख्या आणि परिपूर्ती आपली आपण ठरवायची असते . ' क्लिप आमचा गुरु ' या भंपक न्यायाने एकतर लिंगाची लांबी , स्लखन होण्यासाठी लागणारे तासंतास , मोठ मोठ्याने ओरडणे वगैरे या सर्वांची गोळाबेरीज म्हणजे 'सेक्स ' अशी समजूत होण्याचे आणि त्यांना जाहिराती इत्यादी यातून खतपाणी घालायचे प्रकार वाढत आहेत .

 लिंग आणि योनी याबाबत 'अभ्यास ' किती लोक करतात ?? आपल्याच शरीरातील एखाद्या अवयवाची माहिती आणि काळजी घेणे यात 'गैर ' काहीच नाही . सेक्स यावर हजारो कोटी मिळवणारी कोणती कंपनी स्त्री -पुरुष यांच्या 'जननेंद्रियांची ' काळजी आणि स्वछता यावर जागृती करण्यास 1 रुपया तरी खर्च करते ?? कोणत्या साईट वर काय 'एक्स्ल्युसिव्ह ' आहे याची 'बित्तमबातमी ' असणाऱ्या किती लोकांनी 'स्मेग्मा ' हा शब्द ऐकला आहे ? त्याची सफाई नाही केली तर काय परिणाम होऊ शकतात याचा शोध घेतला आहे ?? स्त्रियांच्या बाबत सुद्धा हेच . . पाळी सुरु असताना एक पॅड वापरल्याने ट्रेन च्या पायरी पासून ते हिमालयाच्या शिखरापर्यंत सर्व काही 'पादाक्रांत ' करायच्या कोट्यवधी रुपयांच्या  जाहिराती करणारे पाळी नंतर योनी स्वछता कशी करायची यावर किती रुपये खर्च करतात ?? अशी उदाहरणे असंख्य देता येतील या सर्वांचा लसावि एकच . . की आपले शरीर आणि 'तो ' विषय याची 'शास्त्रीय ' माहिती घेण्यात काहीच गैर  नाही !

बरं सेक्स हि काय 'रोज ' करायची गोष्ट आहे का ? जरी केली तरी त्या नंतरचा आहार काय असावा याबाबत कोणी 'जनहित मै ' काही जारी करतं का ?? वर्तमान पत्रातले कात्रण दुकानात नेऊन मी 'त्या ' गोळ्या , ' ते ' तेल आणि 'तो ' स्प्रे आणला पण त्याच्या वापराने 'ती ' समस्या सुटते का ?? आचार्य सुश्रुत ' क्षीण बलीयं   वाजीकरणाम  चिकित्सितं ' असे  सांगतात . आता यातील क्षीण बलीय म्हणजे कोण ? ज्याच्या शुक्राचा नियमित क्षय होत असतो आणि तो भरून काढण्यासाठी काहीच उपाय योजना होत नाही असा तो अशी अगदी सामान्य व्याख्या करणे शक्य आहे .  ' बाल्ये विद्या ग्रहणादीनर्थां  कामं च यौवने स्थविरे धर्मम मोक्षम च ' असे म्हणतात . त्यामुळे 'त्या ' विषयाचा यौवनात उपभोग घेत असताना त्याची पूर्ण आणि शास्त्रीय माहिती घेऊन मगच पुढे जाणे आवश्यक आहे . .

'तो ' विषय म्हणून त्याची शास्त्रीय माहिती न घेणे आणि 'क्लिप माझा गुरु ' या भंपक पणाने  पुढे जात राहणे अनेक व्याधींना निमंत्रण देणारे आहे . . कामशास्त्र किंवा सेक्स यावर मताची ' अश्लील पिंक ' टाकायला जसे आपले वय , शैक्षणिक पात्रता आणि अनुभव याचे बंधन नसते तर त्याची शास्त्रीय माहिती जाणून घ्यायला बंधन कशाला हवे ?? म्हणूनच म्हंटले आज 'त्या ' विषयावर थोडेफार लिहावे . . .



वैद्य . अंकुर रविकांत देशपांडे

आयुर्वेद कोश(https://web.facebook.com/aarogyakosh/ )

(लेख कृपया लेखकाच्या नावासह व नाव न बदलता शेअर करावा . या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते)

No comments:

Post a Comment

Visit Our Page