Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Monday, September 12, 2016

सुख प्रसव आणि संगोपन काळाची गरज –भाग दुसरा

सुख प्रसव आणि संगोपन काळाची गरज –भाग दुसरा

एका रोपट्याला  योग्य वेळी  फळाफुलांनी बहर येण्यासाठी त्याची जोपासना/ ”संगोपन” उत्तम करायला हवे.याच फळातून पुढे उत्तम बीज तयार होते जे आपल्यासारखेच निरोगी सुधृढ रोपट्याची पुनंर्निर्मिती करते. तुकाराम महाराजांनी सांगितलेच आहे,”शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी”!

या जीव सृष्टीचा एक महत्वाचा घटक असल्यामुळे निसर्गाचे नियम आपल्यालाही लागू होतात! वयात येण्याचा कालवधी हा महत्वपूर्ण असतो.त्याच वेळी स्त्री अथवा पुरुष देहात बीज निर्मिती ला सुरुवात होते. फार पूर्वी मुलगी रजस्वला झाली की आनंदोत्सव साजरा केला जाई. रजस्वला होणे हे बीजनिर्मिती आणि त्या अनुषंगाने गर्भधारणा करण्यास सज्ज असे दर्शवित असे. निसर्ग नियमानुसार असणाऱ्या या गोष्टी बद्दल मात्र  “आमचा जन्म काही फक्त मुल जन्माला घालण्यासाठी नाही झालाय” अशी अनास्थाही विशिष्ठ वयात आणि विचारसरणीत  दिसून येते.

गर्भाशय अथवा तदनुषंगिक येणाऱ्या पाळीचे स्वास्थ्य हे फक्त पुनरुत्पादनाच्या दृष्टीनेच सांभाळायचे आहे असे नाही तर स्त्री देहाच्या संपूर्ण स्वास्थ्यासाठी सांभाळणे गरजेचे आहे. आपल्या शरीरात तयार होणारे मल मुत्र जसे योग्य वेळी,योग्य स्वरुपात आणि  योग्य प्रमाणात बाहेर पडायला हवे तसेच पाळीचे रक्त अथवा रजही! पाळीचे आणि शरीराचे स्वास्थ्य एकमेकांवर अवलंबून आहेत. पाळीतून बाहेर पडणारे रक्त म्हणजेच रज हे शरीरातच तयार होते.घेतलेल्या आहारचे रुपांतर पहिल्या रसधातुत जर उत्तम झाले तर त्त्यापासून उत्तम रज तयार होते. म्हणजेच तुमचा आहार कसा आहे आणि त्याचे पचन शरीरात कसे होतेय यावर पाळीचे रक्त कसे तयार होणार हे अवलम्बून असते. आपल्या #metabolism मध्ये बदल झाला की हे चक्र देखील बिघडते. म्हणूनच  वयाच्या काही  विशिष्ठ टप्प्यावर म्हणजे पाळी येताना(उत्पत्ती), गर्भधारणेत(स्थिती),आणि पाळी जाताना (लय )पाळीत आणि शरीरात जे बदल घडतात त्यासाठी यांच्या स्वास्थ्याबद्दलच्या  concept clear असल्या पाहिजेत .

आणि राहिला प्रश्न , आपला जन्म कशाकरिता झालाय चा ?  तर , बाईचा काय किंवा पुरुषाचा काय जन्म का झालाय याचा शोध घेणे हेच खरे तर जन्माचे उद्दिष्ट्य आहे.
असो, आपण नवीन जीवाची निर्मिती करू शकतो हि खरे तर अभिमानाची गोष्ट आहे.हे सांगण्याचे कारण म्हणजे, नुकतेच वयात येणाऱ्या मुलींशी  एक “हितगुज” झाले. पाळी सुरु होण्याच्या टप्प्यावर असणाऱ्या या मुलींन्ना या सर्वाची जेव्हा नैसर्गिक आणि शास्त्रोक्त माहिती सांगितली तेव्हा त्यांच्या मनात असलेली “ आपल्यालाच हि कटकट का?”  अशी नकारात्मक भावना जाऊन त्या जागी चक्क “ यस्स्स्स आपल्याला काहीतरी विशिष्ठ शक्ती आहे!” अशी सकारत्मक भावना आली.यामुळे आता त्या वयाच्या या विशिष्ठ टप्प्यावर उत्सुक आहेत पाळी सुरु होण्यासाठी! पाळीचे स्वरूप नेमके कसे असायल हवे? पाळी सुरु होण्याचे नैसर्गिक प्रयोजन काय?आपल्या संपूर्ण स्वास्थ्यावर पाळीचे स्वास्थ्य अवलंबून कसे असते, या पायाभूत माहितीमुळे त्या नक्कीच उत्तम भविष्य साकारणार यात शंका नाही!

यालाच म्हणतात “संगोपन” , जे सुरु होते बीजापासून..............

क्रमशः
वैद्य ज्योत्स्ना पेठकर ९७६४९९५५१७
डॉ. सुहास हेर्लेकर ९४२२५००३४६
परिवर्तन आयुर्वेद
सुख प्रसव आणि संगोपन

No comments:

Post a Comment

Visit Our Page