Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Friday, October 28, 2016

धन्वंतरी रूप – एक चिंतन

आज धन्वंतरी जयंती! आरोग्य शास्त्राच्या देवतेचा दिवस!

#hindu_god_of_medicine

केवळ आपल्या भारतीय परंपरेतच नाही तर प्राचीन ग्रीक संस्कृतीत सुद्धा प्रत्येक गोष्टीची देवता नेमून दिलेली असायची. प्रत्येक देवतेचे स्वरूप ठरवताना त्यामागे एक सखोल विचार असायचा. एका अव्यक्त शक्तीचे मूर्त स्वरूप कुणी आणि कसे ठरवले असा मला नेहेमी प्रश्न पडायचा ......गणपतीचे रूप असे ठराविकच का? शंकराच्या जटा, त्याचे नील स्वरूप, भस्म विलेपित त्याची काया, असेच त्याचे स्वरूप का? किंवा आपल्या दुर्गा देवीचे दहा हातांमध्ये दहा गोष्टी असेच स्वरूप का? या मागील पौराणिक कथांचा भाग सोडला आणि नीट चिंतन केले तर त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण भौतिक रूपाची कल्पना येते.

आयुर्वेदाला प्रवेश घेतल्यावर “धन्वंतरी” देवतेचा पहिला परिचय झाला. मूर्ती पूजेत फारसे स्वारस्य नसल्याने थोडीफार “विष्णू” सारखी देवता एवढीच नोंद तेव्हा मी घेतली. समुद्र मंथनातून आलेल्या “आयुर्वेदाचे” जसजसे वैचारिक मंथन सुरू झाले तसतसे “धन्वंतरीच्या” स्वरूपाबद्दल ओढ वाटायला लागली. या मूर्त स्वरूपाची रचना अशीच का? याबद्दल जागृत झालेल्या ‘जिज्ञासेमुळे’ अनेक कोडी उलगडली. आपल्या शास्त्रावरचा विश्वास अधिक दृढ झाला.

भगवान विष्णूप्रमाणे रचना असलेल्या धन्वंतरीच्या चारही भुजांमध्ये शंख, चक्र, जालौका आणि अमृतघट अशा ४ वेगवेगळ्या गोष्टी आहेत. या गोष्टी याच क्रमाने का आल्या असतील या मागे देखील खूप शास्त्र आहे. ही रचना मुख्यत: रस-रक्त परिभ्रमण ( circulation)  सूचित करणारी आहे.

बघा हं…….

देवाचे मूर्त स्वरूप हे ‘हृदयाचे’ प्रतिक आहे अशी कल्पना करा. चार हात जणू हृदयाचे चार कप्पे आहेत. वरचे दोन आलिंद – atrium आणि खालचे दोन निलय - ventricle. हृदयातून निघालेले रक्त सर्व शरीरात फिरून पुन: हृदयात प्रथम उजव्या आलिंदात—right atrium मध्ये येते. फिरून पुन: त्याच जागी येणे या गतीला “चक्रवत” म्हणजेच circulatory म्हणतात त्याचेच प्रतिक म्हणून या कप्प्यात “चक्र” आले.

आता हे फिरून पुन: शुद्ध होण्यासाठी आलेले रक्त त्याच्या खालच्या कप्प्यात उजव्या निलायात—right ventricle मध्ये येते. इथून रक्त शुद्ध होण्यासाठी फुप्फुसाकडे जाते. अशुद्ध रक्त पिऊन रक्त शुद्ध करणाऱ्या जळवा या रक्तशुद्धीच्या प्रतीकात्मक म्हणून येथे आल्या.

फुप्फुसामधून शुद्ध रक्त डाव्या आलिंदात—left atrium मध्ये येते.
अर्वाचीन शास्त्रानुसार, शुद्ध रक्त left ventricle मधून महाधमनी (aorta) द्वारे पुन: सर्वत्र फिरत राहते. परंतु येथे एका महत्वाच्या बाबीचे विश्लेषण करणे गरजेचे आहे, जे आयुर्वेदात हजारो वर्षांपूर्वी आपल्या थोर ऋषीमुनींनी करून ठेवलेय! सृष्टीतील कोणत्याही पदार्थाचे सेवन आपण करतो तेव्हा आपले शरीर, मन आणि इंद्रिये ते तसेच स्वीकारत नाही. ते सात्म्य होण्यासाठी, शारीरादि भावांमध्ये त्याचे रूपांतर होण्यासाठी योग्य ते संस्कार होणे गरजेचे असते. जसे आहारावर “पाचक अग्नि” संस्कार!

या specific बाबतीत आकाश आणि वायू महाभूतांचे शब्द-स्पर्श-गुण भूयिष्ठ संस्कार या शुद्ध रक्तावर होतात. तेव्हा जी नादोत्पत्ती होते त्यालाच व्यवहारात हृदयाचे ठोके अथवा दिल की धडकन, अथवा लब-डब heart sound म्हणतात. शब्द अथवा ध्वनी यांचे प्रतिक म्हणून या डाव्या कप्प्यात “शंख” आले आहे.

अर्वाचीन शास्त्रामध्ये respiratory system  मध्ये नाक, pharynx आणि फुप्फुस हे अवयव येतात. तर आयुर्वेदानुसार “अंबरपियूषाचा – oxygen” चा स्वीकार जरी फुप्फुसात होत असला तरी त्याला जीवनीय गुणांनी युक्त करण्याचे काम हे हृदयात होत असल्याने प्राणवह स्रोतासाचे मूळ, फुप्फुस न सांगता, हृदय सांगितले आहे.
आता असे हे शुद्ध्योत्तर  संस्कारित रक्त त्या व्यक्तीस सात्म्य झाल्याने सर्व पेशींना जीवनीय झाल्याने अमृतासमान आहे. असे हे अमृतासमान रक्ताचे धारण डाव्या निलयात— left ventricle होत असल्याने या कप्प्याचे प्रतिक ‘अमृतघट’ आहे.

‘मंथन’ या प्रक्रियेत खरोखर खूप गवसते. या मूर्त स्वरूपामागील  कारण मीमांसेने माझा आयुर्वेदावरचा विश्वास अधिकाधिक दृढ होत गेला. याचे ग्रंथोक्त शास्त्रीय विवेचन कुठेही आलेले नाही. (काही वैद्य मंडळी आधी हेच विचारतील म्हणून आधीच सांगितले). “हे असेच का?” या जिज्ञासेपोटी  निर्माण झालेला  logical  विचार आहे.

समुद्रमंथनातून निरोगी जीवसृष्टीसाठी आयुर्वेद शास्त्र घेऊन आलेल्या “भगवान धन्वंतरी” यांचा आशीर्वाद चराचर सृष्टीला निरंतर लाभत राहो, ही प्रार्थना!!!

जय भगवान धन्वंतरी!

©वैद्य ज्योत्स्ना पेठकर
परिवर्तन आयुर्वेद
सुख प्रसव आणि संगोपन
९७६४९९५५१७

No comments:

Post a Comment

Visit Our Page