Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Friday, November 4, 2016

हिवाळा आणि सुका मेवा

हिवाळा  आणि सुका मेवा

दिवाळी  संपली  आणि  या  वर्षी  लगेच थंडीची  चाहूल लागली  .रात्री थोडं गार  वाटायला  लागलंय असं  म्हणेपर्यंत पहाटे चांगलाच  गारवा जाणवू लागला आहे .धुकं पडायला लागलंय आणि शेकोट्या ही पेटायला लागल्या  आहेत .हळूहळू शरद ऋतू संपून आपली वाटचाल हेमंत ऋतूकडे व्हायला लागली आहे .आता दिवस लहान आणि रात्र मोठी होत जाणार .
ह्या ऋतू बदलांचा आपल्या शरीरावर परिणाम होतंच असतो .शरीर हवेतील बदलांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असते ,जर हे बदल वेळीच ओळखून आपण शरीराला मदत केली  तर  आजारपण येत नाही .
जेव्हा हवा फार उष्ण असते तेव्हा आपल्याला घाम  येतो  आणि त्या द्वारे शरीर  स्वतःचे तपमान कमी  करून  शरीर थंड ठेवण्याचा प्रयत्न करते .याच्या विरुद्ध घटना थंड हवामानात घडते .बाहेर भरपूर गारवा असताना शरीराचे तापमान  टिकवून  ठेवण्याचा शरीर प्रयत्न करत असते .यासाठी शरीराची रंध्रे बंद केली जातात ,घाम येत नाही आणि उष्णता शरीरात रोखून धरली जाते .याचाच दुसरा परिणाम म्हणून शरीराचा जाठराग्नी म्हणजेच पचनशक्ती संधुक्षित होते म्हणजेच वाढते .भूक चांगली लागू लागते .मुख्य म्हणजे शरीराचे बल वाढवण्याचा हा काल आहे .याला आयुर्वेदात विसर्ग काल  असे म्हटले जाते .याचा अर्थ शरीराची ताकत वाढवण्यासाठी या काळात निसर्गाकडून शरीराला साथ मिळते .उन्हाळ्याच्या दिवसात आपण लवकर थकतो ,आपली energy level टिकत नाही पण हिवाळ्यात आपला उत्साह ,शक्ति टिकून राहू शकते .म्हणूनच या दिवसात भरपूर खावे आणि भरपूर व्यायाम करावा असे म्हटले जाते .यालाच Healthy season असेही म्हटले जाते ,कारण या दिवसात आपोआपच आजारपणे कमी होतात कारण हवा स्वच्छ असते ,जीवजन्तुंचे प्रमाण कमी असते .पुढे येणाऱ्या ऋतूच्या दृष्टीने ताकत कमवायची  असेल तर सगळ्यात जास्त लक्ष द्यायला हवे ते आहारावर !
याच विचाराने आपल्याकडे हिवाळ्यात विशेष पौष्टिक आहार घेण्याची पद्धत  आहे जी अतिशय योग्य आहे .बलवर्धक  आणि शरीर स्निग्ध राहण्याच्या  दृष्टीने सर्वात चांगला आहार कोणता असेल तर तो म्हणजे सुका मेवा !
आपल्याकडे थंडीत लाडू करण्याची पद्धत आहे .काजू ,बदाम ,पिस्ते ,खोबरं ,खारीक ,खसखस ,डिंक ,मेथ्या असे विविध पदार्थ वापरून ,साजूक तूप आणि गूळ वापरून हे लाडू  तयार केले जातात .यातील बहुतेक सगळे पदार्थ हे स्निग्ध गुणाचे आहेत आणि पौष्टिक आहेत .हिवाळ्यात हवेत कोरडेपणा वाढतो आणि तसाच तो  शरीरातही वाढतो .त्वचा कोरडी होते ,टाचा फुटतात ,डोक्याची त्वचा कोरडी होऊन कोंडा होतो .त्वचेची स्निग्धता टिकवायची असेल तर बाहेरून स्निग्ध गोष्टी पुरवणे गरजेचेच आहे आणि त्यासाठीच या लाडूंची योजना आहे .सगळा सुका मेवा आणि त्यात तूप ,गूळ मिसळल्यामुळे शरीराला लागणारी उर्जा भरपूर प्रमाणात पुरवली जाते आणि ती शरीरात साठवली जाते .
हे लाडू विशेषकरून लहान मुले आणि वयस्कर व्यक्तींसाठी फार उपयोगी आहेत .फक्त ते खाताना काही नियम पाळणे आवश्यक आहे .हे लाडू बांधताना रवा ,बेसन लाडू सारखे मोठे बांधू नयेत कारण यातील सगळे घटक पौष्टिक असले तरी त्याचवेळी ते पचायला जडही असतात त्यामुळे एकावेळी फार मोठा लाडू खाल्ला तर पचनशक्तीवर ताण येऊ  शकतो म्हणून बेताच्या आकारातच लाडू बांधावे .सकाळी चांगली भूक लागलेली असताना ,उपाशीपोटी हा लाडू खावा .लाडू खाल्ल्यानंतर किमान दोन तास काहीही खाऊ नये .खास करून लहान मुले आवडला म्हणून एकावेळी जास्त लाडूची मागणी करू शकतात पण तरीही हे पथ्य अवश्य पाळावे .
ज्यांना डायबेटीस मुळे गोड खाण्यावर बंधन आहे त्यांना हाच लाभ मिळावा म्हणून गूळ सोडून इतर मेवा आणि त्यात खजूर मिसळून लाडू करता येतात किंवा सुक्या मेव्याची पावडर करून ती दुधाबरोबर घेतली तरी हे फायदे मिळू शकतात .

वैद्य राजश्री कुलकर्णी
M .D .( आयुर्वेद )
आयु:श्री आयुर्वेदिक हॉस्पिटल
स्वामी समर्थ केंद्राजवळ
रथचक्र सोसायटी मागे
इंदिरानगर ,नाशिक ९
फोन : (०२५३ ) २३२२१००

No comments:

Post a Comment

Visit Our Page